
पाटणा, बिहार : खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 च्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअली सहभागी होत देशातील युवकांना प्रेरणा दिली. यावेळी त्यांनी विशेषत: बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्या उल्लेखनीय प्रदर्शनाचं कौतुक करत त्याच्या यशामागची मेहनत आणि समर्पण अधोरेखित केलं.
“वैभव सूर्यवंशी देशाचं नवनवीन स्वप्न उभारत आहे” – मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण सर्वांनी बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशी याचं आयपीएलमधील प्रदर्शन पाहिलं आहे. त्याने सर्वात कमी वयात एक ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तो जितका अधिक खेळेल, तितका तो अधिक उजळून निघेल.”
वैभवचं यश हे त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचं फळ असून, स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर खेळून मिळवलेलं अनुभवसंपन्न कौशल्य त्याला उंचावर घेऊन गेलं, असं मोदींनी सांगितलं.
“खेळ हे केवळ स्पर्धा नसून देशाचं भविष्य घडवणारा मार्ग”
मोदींनी आपल्या भाषणात भारतातील क्रीडा क्षेत्राच्या विकासावर प्रकाश टाकताना म्हटलं की, “भारताने आता क्रीडा क्षेत्रातही जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. खेळांच्या माध्यमातून देशाची सॉफ्ट पॉवर वाढते आणि जगात भारताचा प्रभाव अधिक दृढ होतो.”
क्रीडा क्षेत्रासाठी ४,००० कोटींची भरीव गुंतवणूक
पंतप्रधानांनी जाहीर केलं की, केंद्र सरकारने देशातील क्रीडा अधोसंरचना बळकट करण्यासाठी ४,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. “खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, ग्रामीण भागातील युवकही राष्ट्रीय स्तरावर खेळावेत, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भारतात खेळांचं भविष्य उज्वल आहे आणि यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केली जातील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ सारख्या उपक्रमांमुळे देशातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळतंय. वैभव सूर्यवंशीसारख्या युवा खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक युवकांना खेळाच्या माध्यमातून यशाची वाट मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या या उद्बोधक भाषणातून भारतात क्रीडा संस्कृती वाढवण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.