शिवसेना थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार शेमडा, नाव न घेता राणेंचा केसरकरांवर प्रहार

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथे सोमवारी आयोजित केलेल्या भाजप मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार देखील शेमडा आहे अशा शब्दात त्यांनी सेनेवर जोरदार प्रहार केला आहे.

मी जेव्हा आमदार आणि मंत्री होतो तेव्हा विधानसभेत जे काम केलं त्याची विधानसभा आजही दखल घेते. इकडे आमदारापेक्षा सरपंच चांगला वाटतो अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नाव न घेता सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर ( Deepak Vasant Kesarkar ) यांच्यावर केली आहे.

यावेळी राणे बोलताना म्हणाले, सावंतवाडी हा माझा आवडता मतदार संघ आहे, मात्र हा मतदार संघ आणि कुडाळ मतदार संघ आपल्याकडे नाही याची मला खंत वाटते. त्यामुळे पुढे येणाऱ्या निवडणुकीत या तिन्ही जागा भाजपकडे असतील असा प्रयत्न करा.

आता सर्वांनी कामाला लागा, आपापसात जे काही मतभेद असतील तर ते दूर करा, आता आपल्याला यश मिळालेच पाहिजे. मी आता दिल्लीत आहे त्यामुळे आता तुम्ही घाबरू नका बिनधास्त राहा. प्रामाणिकपणे काम करत राबा कोणावरच अन्याय होणार नाही याची जवाबदारी मी घेतो. येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये भाजप कसं जिंकू शकतं यावर लक्ष द्या असं आव्हान नारायण राणे यांनी येथील भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

राणे पुढे म्हणाले, दीपक केसरकर यांनी या ठिकाणी दोन हजार कोटीचा प्रकल्प सांगत लोकांची दिशभूल केली आहे. याआधी त्यांनी चष्म्याचा कारखाना , सेट-टॉप-बॉक्स असे अनेक उपक्रम राबवण्याची आश्वासन दिली होती. मात्र ती सगळी आश्वासने हवेतच विरली. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये अश्या लोकांना घरचा रस्ता दाखवा, असं आवाहन नारायण राणेंनी केलं आहे.