
मुंबई – राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे म्हणाले, “शिवसेनेला सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते त्यांना मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. राज्यात सत्तेमध्ये येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
नारायण राणे पुढे म्हणाले, आमदारांची भाजपावर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपा जिंकली, निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली आहे. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे. असं नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.