नवी दिल्ली: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुस्कार नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी मुज़फ्फर पटेल यांनी स्वीकारला.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने आज ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यासह ‘जलशक्ति अभियान : कैच द रेन 2023’ या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ति राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, विश्वेश्वर टुडू, केंद्रीय संचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, जल संसाधन, नदीविकास सचिव पंकज कुमार व्यासपीठवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने देशभरातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या महिलांचा ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यातील 18 महिलांचा सन्मान राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून करण्यात आला. तर, 18 महिलांचा सन्मान केंद्रीय जलशक्ति मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यातील नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी पटेल यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात केंद्रीय संचार मंत्रालयाच्यावतीने ‘माय स्टॉप’ या विशेष डाक तिकीटीचे लोकार्पण राष्ट्रपती यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या औचित्याने जलशक्ति मंत्रालयाच्या प्रेरणेने करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली ग्रामपंचायतीमध्ये असा घडवला बदल
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली- हिंगणी हवेली-खामगाव-जप्ती पारगाव समूहाच्या ग्रामपंचायतच्या सरपंच शेख मन्नाबी पटेल यांनी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा पूरविला जातो तसेच याची नीट देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरविण्यात आले. या गावांमध्ये 100% नळ जोडणी असून गावतील प्रत्येक घरात नळ असल्याचे (हर घर जल) घोषित करण्यात आले. सर्वच कुटुंबे पाणीपट्टी जमा करतात. गावात सर्वांना कार्यान्वित नळ जोडणी मिळाली आहे. गावातील सर्वच भागात समान दाबाने पाणी मिळते, त्यासाठी जलसुरक्षक यांना प्रशिक्षण दिले असून गावात गृहभेटी दरम्यान वारंवार याबाबत माहिती घेतली जात असल्याचे श्रीमती पटेल यांनी सांगितले.
यासह नियमित पाणीपुरवठा नसल्यास याबाबतच्या तक्रारींची माहिती गृहभेटीदरम्यान किंवा जलसुरक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्यास तात्काळ त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ग्रामपंचायत व सरपंच दखल घेतात. पुढच्या गृह भेटीत तक्रारीचे निवारण झाले असल्याची खात्री करून घेतात. या नियमित भेंटीमुळे तक्रार पुस्तिकेची अथवा तक्रार पेटीची आवश्यकता भासत नाही. तक्रांरीचा निपटारा लगेच लागतो. गावातील नळ पाईप लाईनमध्ये पाणी गळती किंवा तूट फूट नसल्याने नियमित शुद्ध पाणीपुरवठा होत असतो. पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत गावात पाणी तपासणी साठीची ‘एफ टी के किट’ उपलब्ध आहे. त्याद्वारे, पाण्याचे नियमित रासायनिक व अनुजैविक तपासणी केली जाते. तसेच, पाण्याचे नियमित क्लोरीनेशन केले जाते, अशी माहिती श्रीमती पटेल यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.
याकार्यक्रमास राज्यातून रायगड जिल्ह्यातील सलविंदेच्या सरपंच सोनल घुले, अहमदनगर जिल्ह्यातील अमरापूरच्या सरपंच संगीता पोटफोडे, पालघर जिल्ह्यातील कुडन ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया म्हात्रे, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित बापुराव पवार, राज्य पाणी पुरवठा विभागाच्या अवर सचिव राजेश्री सारंग, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन चे समन्वयक किरण गुमरे, अर्पणा डानोरीकर सहाय्यक सल्लागार हे राज्याचे प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमास उपस्थित होते.