चुरशीच्या लढतीत नांदेडची रत्नागिरी संघावर मात

WhatsApp Group

पुणे:  के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये पहिल्या दिवशी दुसरा सामना रत्नागिरी जिल्हा विरुद्ध नांदेड जिल्हा यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत सामन्याची सुरुवात संथ केली होती. नांदेड कडून याकूम अरसलन पठाण तर रत्नागिरी जिल्हा कडून अमरसिंग कश्यप यांनी चढाईत गुण मिळवत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. पहिल्या 13 मिनिटाच्या खेळात दोन्ही संघ 8-8 असे समान गुणांवर खेळत होते.

रत्नागिरी कडून अमरसिंग कश्यप, वेद पाटील यांनी चढाईत तर श्रेयस शिंदे ने पकडीत गुण मिळवले. नांदेड कडून याकूम पठाणच्या खेळीने रत्नागिरी संघाला मध्यंतराला मोठी आघाडी मिळून दिली नाही. 12-11 अशी अवघ्या 1 गुणांची आघाडी रत्नागिरी संघाने मिळवली होती. मात्र मध्यंतरा नंतर याकूम पठाणच्या आक्रमक चढयांनी सामन्यात चुरस वाढवली. नांदेड संघाने रत्नागिरी संघाला ऑल आऊट करत 23-19 अशी आघाडी मिळवली. नांदेडच्या सौरभ राठोड, मोहसीन पठाण व निसार पठाण यांनी उत्कृष्ट पकडी करत संघाला आघाडी 27-21 अशी आघाडी मिळवून दिली.

नांदेड संघाने चुरशीच्या झालेल्या ह्या सामन्यात रत्नागिरी संघावर 30-28 असा विजय मिळवत गुणतालिलेत गुणांचा खात उघडला. नांदेड कडून याकुम पठाण ने चढाईत 13 व पकडीत 2 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली तर सौरभ राठोड ने 3 पकडी केल्या. रत्नागिरी कडून श्रेयस शिंदे ने पकडीत 4 गुण मिळवले. अभिषेक शिंदे ने चढाईत 6 गुण मिळवत सामन्यात चुरस आणली होती मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

  • बेस्ट रेडर- याकूम पठाण , नांदेड
  • बेस्ट डिफेंडर- श्रेयस शिंदे , रत्नागिरी
  • कबड्डी का कमाल- निसार पठाण, नांदेड