
मुंबई – चेरापुंजी येथील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एका महिलेसोबतचा व्हिडिओ शेअर करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता.
चित्रा वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओबाबत बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हे सगळं प्रकरण आमची लिगल टीप पाहात आहे, मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, राजकारणाची पातळी खाली उतरली आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची प्रक्रीया सुरू आहे. आमची लिगल टीम यावर काम करत आहे असे पटोले म्हणाले आहेत. मला त्या ताईंबद्दल काही बोलायचं नाही. आमच्या प्रकरणामध्ये काय घडलंय ते आमची लिगल टीम पाहते आहे. त्यामुळे खरं काय ते समोर येईल, असं नाना पटोले म्हणाले.
माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी नेत्याने राज्यात आपले स्थान निर्माण केले की त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते. आमचा पक्ष याची चौकशी करेल. नाना पटोले यांनी त्यांच्या कायदेशीर पथकाला व्हिडिओची चौकशी करून चित्रा वाघ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.