मुंबई – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रवीण दरेकरांवर खोचक टीका केली आहे. मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे.
बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आपले आडनाव बदलून दरोडेखोर असं करावे, असा खोचक सल्ला नाना पटोले यांनी दरेकर यांना दिला आहे. मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसं स्पष्टही झाले आहे. सहकार विभागाला यावर कारवाई करण्याचा अधिकार आहेत, त्यानुसार सहकार विभागानं ही कारवाई केलेली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होतं असते तेव्हा करेल तो भरेल असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिलाआहे. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून त्यांनी राज्यपालांवरही टीका केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे.
सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येणार. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते आता‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?, असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.