नमो भारत ट्रेनमधील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला नवं वळण; बदनामीच्या भीतीने पालकांनी उरकला साखरपूडा, लवकरच अडकणार लग्नबंधनात
गेल्या काही दिवसांपासून ‘नमो भारत’ (रॅपिड ट्रेन) मधील एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे देशभरात चर्चेत आलेल्या त्या तरुण-तरुणीच्या आयुष्यात आता एक मोठी घडामोड घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी समाजमाध्यमांवर प्रचंड टीका सोसाव्या लागलेल्या या जोडप्याची अखेर त्यांच्या कुटुंबियांनी साखरपुडा उरकून घेतला आहे. लग्नाचा मुहूर्त निघताच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी काय होती घटना?
गेल्या २० डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ‘नमो भारत’ ट्रेनमधील सीसीटीव्ही फुटेजचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळचे होते, ज्यामध्ये गाझियाबादहून मेरठला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक तरुण आणि तरुणी अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले होते. १ ते ३ मिनिटांचे हे चार व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरले आणि रेल्वेतील सुरक्षिततेसह सार्वजनिक शिष्टाचारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
कुटुंबियांनी घेतला सगाईचा निर्णय
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याची ओळख पटली. दोघेही मोदीनगर परिसरातील रहिवासी असून गाझियाबादमधील वेगवेगळ्या नामांकित महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण (एक बीटेक आणि दुसरी बीएसए) घेत आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना समाजात प्रचंड बदनामीचा सामना करावा लागला होता. लोकलज्जेस्तव कुटुंबियांनी सुरुवातीला दोन्ही मुलांना शहराबाहेर पाठवले होते. मात्र, दोघेही एकाच जातीचे असल्याने आणि प्रकरण हाताबाहेर गेल्याने, दोन्ही कुटुंबांनी सामंजस्याने या वादावर पडदा टाकण्यासाठी मुलांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
लग्नाचा मुहूर्त आणि गुप्तता
मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा साखरपुडा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला आहे. लग्नाचे मुहूर्त सुरू होताच त्यांच्या विवाहाच्या रस्मा पूर्ण केल्या जातील. सामाजिक दबावामुळे आणि पुन्हा कोणताही वाद नको म्हणून या विवाहाला केवळ घरातील मोजक्याच मंडळींना निमंत्रित केले जाणार आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या सगाईबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. मोदीनगरचे एसीपी अमित सक्सेना यांनी सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या वैयक्तिक निर्णयाशी संबंधित असून पोलिसांकडे तशी नोंद नाही.
