रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नागपूर – नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.
शहरातील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत असलेल्या काळात विविध स्टार्ट-अप्सनी नवा इतिहास घडविल्याचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, विविध नवीन क्षेत्रे व्यावसायिकतेच्या परिघात येत चालली असून त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. स्टार्ट-अप्स आणि अॅपवर आधारित उद्योगांनी अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात हे नवीन उपक्रम सुरु झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीसोबतच महसूल प्राप्ती होणार असल्याने हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरु शकतो.
नागपूर आयआयएमच्या अद्ययावत आणि विविध वैशिष्ट्यांनी समाविष्ट परिसराच्या उभारणीबाबत प्रशंसोद्गार काढून राष्ट्रपती म्हणाले, येथील स्थानिक संस्कृती आणि इतिहास या वास्तुतून परिपूर्णतेने प्रतिबिंबित होत असून तिच्यातून पर्यावरणाप्रती बांधिलकीही दिसून येते. महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली.
अशा भूमीतील संस्थेने केवळ अध्ययन केंद्र न राहता जीवनदायी अनुभव देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करून या संस्थेच्या सेंटर फॉर एक्सलन्स, नागपूर फाउंडेशन फॉर इंटरप्रूनरशिप डेव्हलपमेंट, सॅटेलाईट कॅम्पस, रिजनल इनोव्हेशन ऑर्गनायझर या उपक्रमांचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. हे उपक्रम आत्मनिर्भर भारतासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरात आपल्या कर्तृत्वासाठी नवी क्षितिजे शोधताना आपल्या भूमीतील मुल्यांचा विसर पडू देवू नका, असे आवाहन करून नागपूर आयआयएमचा परिसर हा नव्या जगातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तरुण मनांचे योग्य पद्धतीने संगोपन करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.