महाराष्ट्र हादरला! २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या, ३ घरांनाही लावली आग

WhatsApp Group

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यामधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारशिंगवे (ता. इगतपुरी) या भागातील हे टोळके असून या टोळक्यात आदिवासी समाजाचे १० ते २० जण आहेत. जमिनीच्या वादातून या टोळक्याने शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कातकरी वस्तीवर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे तर, वस्तीतील ३ घरे सुद्धा या टोळक्याने जाळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.