महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

WhatsApp Group

पुणे, नवी मुंबई, वसई-विरारसह १३ महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या २९ जुलै रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याआधी सोडत काढण्यात आली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढण्यात येत आहे. यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६/२०२१ मध्ये दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधीन आदेशान्वये महानगरपालिकांच्या सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण याबाबतचे दि. २८ डिसेंबर, २०२१ चे आदेश सुधारीत केले आहेत. त्यास अनुसरुन आता समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवावयाच्या आहेत. या सुधारणेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने काढणे आवश्यक आहे. दरम्यान, यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

(महिला व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट- ड (मराठी) व परिशिष्ट-इ (इंग्रजी) मधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिध्द करणे. (त्याची स्थानिक वर्तमानपत्र, वेबसाईट, सूचना फलक इ. वर प्रसिध्दी द्यावी.) यासाठी 26 जुलै तारीख देण्यात आली आहे. तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, यासाठी २९ जुलै तारीख देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 30 जुलै  ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ३० जुलै ते २ऑगस्ट पर्यंत  देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी ५ ऑगस्ट ची मुदत देण्यात आली आहे.