मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्रातील मानाच्या निवडणुकांपैकी एक असून या निवडणुकीसाठी आता भाजपने आपली कंबर कसली आहे. भाजपच्या ६६ उमेदवारांची पहिली अनौपचारिक यादी समोर आली आहे. रविवारी रात्री भाजपने काही उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले आहेत, ज्यामुळे निवडणूकांबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात जागावाटपाची खलबतं सुरू होती. काही जागांवरून दोन्ही पक्षांत पेच असला तरी, ज्या जागांवर एकमत झालं आहे, तिथे भाजपने वेळ न घालवता आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे. दादरच्या पक्ष कार्यालयात उमेदवारांना बोलावून त्यांच्या हाती एबी फॉर्म सोपवण्यात आले. या पहिल्या ६६ जणांच्या ताफ्यात अनेक अनुभवी माजी नगरसेवक तर आहेतच, पण या यादीत मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या यादीतलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर. ज्यांनी आजवर नाटकाच्या रंगमंचावर आणि सिनेमाच्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकली, त्या आता राजकारणाच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत.
निशा परुळेकर यांनी भरत जाधव यांच्यासोबत ‘सही रे सही’ सारख्या तुफान गाजलेल्या नाटकात काम केलं आहे. २०१७ मध्ये त्यांचे ‘महानायक‘ आणि ‘शिमणा‘ हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. कोठारे व्हिजन यांनी निर्मिती असलेल्या ‘दक्खनचा राजा ज्योतिबा‘ या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता थेट जनसेवेसाठी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतापासूनच उत्सुक झाले आहेत.
