मुंबई लोकलमध्ये ‘अजब खादाडी’! चहामध्ये केळं अन् कच्चं वांगं खाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; प्रवाशांनी धरलं डोकं

WhatsApp Group

आपली अलोट गर्दी आणि वेगासाठी ओळखली जाणारी मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणजेच लोकल ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण डब्यातील गर्दी किंवा हाणामारी नसून, एका प्रवाशाची अत्यंत विचित्र खाण्याची पद्धत आहे. कंटेंट क्रिएटर प्रणय जोशी याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये प्रणयने असे काही ‘फूड कॉम्बिनेशन’ (Weird Food Combination) ट्राय केले आहेत, जे पाहून सोबतच्या प्रवाशांनी अक्षरशः आपले डोके धरले आहे.

आल्याला टोमॅटो सॉस अन् चहामध्ये केळं

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रणय लोकलच्या दरवाज्यापाशी असलेल्या सीटवर आरामात बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी दोन वृद्ध प्रवासी बसले आहेत. प्रवासादरम्यान प्रणय अचानक आपल्या पिशवीतून आल्याचा एक मोठा तुकडा बाहेर काढतो आणि त्यावर ‘टोमॅटो सॉस’ लावून तो मजेत खाऊ लागतो. हे पाहून शेजारील प्रवासी अवाक होतात. मात्र, आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा तो चहाचा कप बाहेर काढतो आणि त्यात चक्क ‘केळं’ बुडवून खाण्यास सुरुवात करतो. हे पाहून आजूबाजूच्या प्रवाशांना हसावे की रडावे, हेच समजेनासे झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prannay🐸 (@prannayjoshi)

कच्चं वांगं आणि कोबीवर ताव

प्रणयचे अजब पराक्रम इथेच थांबले नाहीत. आलं आणि केळ्यानंतर त्याने थेट पिशवीतून कच्चा कोबी आणि अखंड वांगं बाहेर काढलं आणि ते खाण्यास सुरुवात केली. हे पाहून डब्यातील एका प्रवाशाचा धीर सुटला आणि त्याने विचारले, “भाऊ, कच्चं वांगं का खातोयस?” त्यावर प्रणयने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिले की, “कच्च्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.” मात्र, आहारतज्ज्ञांच्या मते, वांग्यासारख्या भाज्या नेहमी शिजवूनच खाणे आरोग्यासाठी हिताचे असते.

३ कोटींहून अधिक व्ह्यूज; नेटकरी घायाळ

प्रणय जोशीच्या (@prannayjoshi) या व्हिडिओला आतापर्यंत ३.३ कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याच्या या अतरंगी खाण्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटले की, “भावाचा कॉन्फिडन्स लेव्हल सातव्या अस्मानावर आहे, पूर्ण व्हिडिओमध्ये तो एकदाही हसला नाही.” तर दुसऱ्या एका युजरने मिश्किलपणे विचारले की, “विचित्र खाणं ठीक आहे, पण याला मुंबई लोकलमध्ये बसायला सीट कशी काय मिळाली, याचं मला जास्त आश्चर्य वाटतंय!”