जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल 2022 ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंतचा मुंबई इंडियन्सचा Mumbai Indians संघ हा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. मुंबईच्या संघाने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
2008 पासून आतापर्यंत 14 वेळा आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त 6 संघांनी विजेतेपद मिळवले आहे. तर एकूण 10 संघांनी आजवर अंतिम फेरी गाठली आहे. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, परंतु त्यानंतर हा संघ पुन्हा कधी अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही.
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकले आहे, मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आणि चेन्नई सुपर किंग्सने हे विजेतेपद 4 वेळा जिंकले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. राजस्थान व्यतिरिक्त डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी 1-1 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. सध्याच्या संघांपैकी दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही.
मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले होते. 2013 मध्ये मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा 23 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर 2015 मध्ये मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा 41 धावांनी पराभव केला होता. 2017 मध्ये मुंबईने रायझिंग पुणे सुपरजायंटचा 1 धावाने पराभव केला तर 2019 मध्ये मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावाने पराभव करून चौथ्यांदा आयपीएल जिंकले. 2020 च्या फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. आणि 5 वे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.