मुंबई इंडियन्सचा दमदार विजय: चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव, रोहित-सूर्यकुमार यांची धडाकेबाज खेळी

WhatsApp Group

मुंबई इंडियन्सने जबरदस्त कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्जवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. घरच्या वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी एकतर्फा वर्चस्व गाजवत सामना केवळ १६ व्या षटकातच संपवला आणि प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःची पकड मजबूत केली.

या सामन्यात मुंबई ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. चेन्नईनेप्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७६ धावा केल्या. मात्र, हे लक्ष्य मुंबई इंडियन्ससाठी अवघड ठरले नाही. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीत मुंबईने केवळ एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले.

दमदार सलामी 

१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने जबरदस्त सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी ६३ धावांची सलामी भागीदारी करत संघाला भक्कम पाया दिला. रिकेल्टन २४ धावा करून माघारी परतला, पण त्यानंतर मैदानात सूर्यकुमार यादव उतरला आणि चेन्नईच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला.

रोहित आणि सूर्य यांच्यात झालेली ११४ धावांची अटूट भागीदारी हा या सामन्याचा निर्णायक टप्पा ठरला. रोहित शर्माने ४५ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने केवळ ३० चेंडूत ६८ धावांची झंझावाती खेळी साकारली. या दोघांनी मिळून १० चौकार आणि ११ षटकार मारत वानखेडेवर कहर केला.

सीएसकेच्या गोलंदाजांचे अपयश

चेन्नई सुपर किंग्जसाठी या पराभवाचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे अपयश. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसमोर सीएसकेचा संपूर्ण गोलंदाजी आक्रमण निष्प्रभ ठरले. चेन्नईच्या फिरकीपटूंनी १० षटके टाकून फक्त एकच विकेट घेतली, जे विजयासाठी पुरेसे ठरले नाही.

या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामन्यांत फक्त २ विजय मिळवले असून, उर्वरित सामने जिंकणे आता त्यांच्या प्लेऑफ प्रवेशासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला आता प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागेल, अन्यथा प्लेऑफचं स्वप्न अपूर्ण राहील.

मुंबई इंडियन्सची विजय हॅटट्रिक

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी हा सलग तिसरा विजय असून त्यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. या लयीतून ते आगामी सामन्यांत अधिक आत्मविश्वासाने उतरणार आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची फॉर्म पुन्हा एकदा संघासाठी वरदान ठरत आहे.