हैदराबादवर विजय मिळवूनही मुंबईचा झाला ‘पराभव’!
शुक्रवारी आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 55 व्या सामन्यात मुंबईच्या संघाने हैदराबादचा 42 धावांनी पराभव केला. मात्र या विजयानंतरही मुंबईचा संघ प्लेऑफला पात्र ठरला नसून आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे.
या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास अतिशय वाईट होता, या वर्षी मुंबईने एकूण 7 सामने गमावले आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नाही. 2018 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना सुरू होईपर्यंत मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत होते. या सामन्यात हैदराबादचा 171 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव केला असता तर प्लेऑफमध्ये पोहोचला असता. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र विजायाचे अंतर 171 किंवा त्याहून अधिक ठेवता आले नाही.
मुबंईसाठी इशान आणि सुर्याने रचला धावांचा डोंगर!
हैदराबादविरुद्ध इशान किशनने 32 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या अविश्वसनीय खेळीत 11 चौकार आणि 4 खणखणीत षटकारांचा समावेश होता. तर सुर्यकुमार यादवने 11 चौकार आणि 3 षटकारांसह 40 चेंडूत 82 धावांची खेळी केली.
हे चार संघ खेळणार आयपीएल 2021 ची प्लेऑफ
मुंबई बाहेर पडल्यानंतर कोलकाता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यापूर्वीच प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. आजच्या लढतीनंतर कोलकाताने प्लेऑफ गाठण्याचा आनंद साजरा केला तर मुंबईचे विजेतेपदाची हॅटट्रीक करण्याचे स्वप्न भंगले
आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स हा सर्वोत्तम संघ म्हणून उदयास आला आहे. जर यावेळी आयपीएल जिंकण्यात मुंबई यशस्वी झाली असती तर सलग तीन वेळा आयपीएल जिंकणारा संघ बनला असता.
मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला हरवून 2020 मध्ये जेतेपद पटकावले, त्याआधी 2019 मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला हरवून आयपीएल जिंकले होते. पण यावेळी मुंबई इंडियन्स नेट रन रेटच्या शर्यतीत मागे पडल्याने अंतिम 4 संघात स्थान मिळवू शकले नाही.