
आयपीएल 2022 चा 44वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 8 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी159 धावांचे आव्हान राजस्थानने दिले होते. मात्र सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला. सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबईने विजय मिळवला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना राजस्थानच्या जोस बटलर आणि पडिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. 5व्या षटकात देवदत्त 15 धावा काढून बाद झाला. यानंतर संजू सॅमसनने 16, डॅरिल मिशेलने 17, जोस बटलरने 67, रियान परागने 3 आणि अश्विनने 21 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने नाबाद 6 आणि ट्रेंट बोल्टने 1 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना हृतिक शोकीन आणि रिले मेरेडिथने 2-2 आणि डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेयने 1-1 बळी घेतला.
First win in the bag – Congratulations to #MI who have beaten #RR by 5 wickets ????????#RRvMI | #TATAIPL | #IPL2022 pic.twitter.com/MDPru1K4pj
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
प्रत्युतरात मुंबईकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक राहिली. रोहित शर्मा 5 चेंडूत 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इशान किशन शानदार फलंदाजी करत होता मात्र तो 18 चेंडूत 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सूर्याकुमारने दमदार खेळ दाखवत संघाला विजयाच्या जवळ आणले. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच्या मागोमाग तिलक वर्मा 30 चेंडूत 35 धावा करत झेलबाद झाला.
शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धावांची गरज होती. कुलदीप सेनच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्ड झेलबाद झाला. त्यानंतर डॅनियल सॅम्सने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला. सलग आठ सामने गमावल्यानंतर संघाने विजय मिळवला आहे.