थर्टी फर्स्टची पार्टी आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी एका तरुणीने आपल्या घरी पार्टी करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या प्रियकराला तिने बोलावलं. यांतर या तरुणीने कथितपणे त्याचं गुप्तांगच कापल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आणि आरोपी तरुणी गेल्या सात वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात होते. पीडित व्यक्ती हा 42 वर्षीय आहे तर आरोपी महिला 25 वर्षीय आहे. या तरुणीने आपल्या घरी प्रियकराला पार्टीसाठी बोलवले होते.
दोघेही गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. या सात वर्षांच्या काळात तरुणीने अनेकदा लग्नाचा तगादा लावला होता, मात्र प्रियकराने प्रत्येक वेळी लग्नास नकार दिला. याच गोष्टीचा राग तरुणीच्या मनात होता. 31 डिसेंबरच्या रात्री न्यू ईयर सेलिब्रेशनच्या बहाण्याने तिने प्रियकराला कलिना येथील आपल्या घरी बोलावले.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा लग्नाच्या विषयावरून कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संतापलेल्या तरुणीने धारदार शस्त्र काढले आणि थेट प्रियकराच्या गुप्तांगावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेतही पीडित व्यक्तीने तिथून पळ काढला आणि आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सांताक्रूझ पूर्व येथील कलिना भागात ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वाकोला पोलिसांनी या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी तरुणी फरार झाली असून, पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.
