महाराष्ट्राची राजधानी मुंबईत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची बातमी आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेटवे ऑफ इंडियाजवळ ६० जणांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली. दुर्घटनेनंतर तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले आणि सर्व लोकांना बाहेर काढले.
मृत्यू झालेल्यांना पाच लाख : दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
नौदलाकडून देण्यात आली माहिती : दरम्यान, या घटनेबाबत नौदलाने रात्री माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १८ डिसेंबर २०२४ रोजी सुमारे दुपारी चार वाजता नौदलाच्या बोटीची इंजिन चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नीलकमल या प्रवासी बोटीला ती बोट धडकली. तटरक्षक दल आणि पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य केले.