
मुंबई – मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’ साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.
अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान #मुंबई ला! @mybmc चा ‘डी’ विभाग व एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नाने उभारणी करण्यात आलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्या हस्ते करण्यात आले.#FoodWaste pic.twitter.com/gzSh8dvljs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 9, 2022
महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकाऊ अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होऊ शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.