Konkan Tourism: कोकण विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दमदार कामगिरी; उत्पन्नात विक्रमी वाढ
मुंबई: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (मपविम) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवली आहे. गणपतीपुळे येथील पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल नोंदवली असून तारकर्ली येथून ३.२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मर्यादित खोल्यांच्या उपलब्धतेतही मिळालेले हे उत्पन्न विभागाचे व्यवस्थापन उत्कृष्ट असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पर्यटन विभागाच्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, मपविमचे व्यवस्थापकीय संचालक निलेश र. गटणे, उपसचिव, पर्यटन, संतोष रोकडे, उपसचिव, पर्यटन, विजय पोवार, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल तसेच सहसंचालक संतोष जाधव उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, कोकण विभागातील गणपतीपुळे आणि तारकर्ली येथील ‘मपविम’ पर्यटक निवासांनी उत्पन्नात मोठी भरारी घेतली आहे. शासनाच्या ‘मपविम’ पर्यटक निवासांमध्ये खाजगी हॉटेल्सप्रमाणेच उच्च दर्जाच्या सुविधा माफक दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे पर्यटकांचा विश्वास वाढत असून पर्यटनाला चालना मिळत आहे. कोकण विभागाने मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक उत्पन्न मिळवून सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग म्हणून मानाचा तुरा मिळवला आहे. या यशाबद्दल पर्यटन मंत्री देसाई यांनी संपूर्ण कोकण विभागाच्या टीमचे कौतुक केले.
या यशामागे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ‘मपविम’चे व्यवस्थापकीय संचालक निलेश र. गटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने, गणपतीपुळेचे निवास व्यवस्थापक वैभव पाटील आणि तारकर्लीचे निवास व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील काळातही पर्यटन क्षेत्र अधिक गतीमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
