‘माही’ची चित्रपट क्षेत्रात एन्ट्री, IPL संपताच करणार मोठी घोषणा!

WhatsApp Group

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात चाहते आहेत. भारतीय संघात कर्णधार असताना त्याने सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. तमिळनाडूमध्येही धोनीच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अशा परिस्थितीत धोनी फिल्मी दुनियेत येऊ शकतो, अशी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी लवकरच एक निर्माता म्हणून तमिळ सिनेमामध्ये प्रवेश करणार आहे. याबाबत, तो आयपीएल 2022 नंतर मोठी घोषणा करू शकतो.

माहीवर ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट यापूर्वीच तयार झाला आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती. दिशा पटानी आणि कियारा अडवाणी धोनीच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

रिपोर्ट्सनुसार, धोनी तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माता बनून या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. या निर्मितीसाठी सध्या काम सुरू असून, एक मजबूत टीम तयार केली जात आहे. आयपीएल 2022 नंतर याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

एमएस धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे, आजही त्याचे देशातील इतर क्रिकेटर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त एमएस धोनी शेती देखील करतो. तो रांची येथील फार्म हाऊसवर शेती करतो, याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.