IPL 2022: धोनी आरसीबीविरुद्ध ओपनिंग करणार? माजी क्रिकेटपटूने बॅटिंग पोझिशनवर केलं विधान

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये आज (मंगळवारी) दोन मोठ्या संघांचा सामना होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करत आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या फलंदाजीची चर्चा होत आहे. महेंद्रसिंग धोनी पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकल्यापासून अपयशी ठरत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेलने एमएस धोनीच्या बॅटिंग पोझिशनवर एक ट्विट केले आहे.

पार्थिव पटेलच्या मते, एमएस धोनीचे तंत्र जरी सलामीवीर फलंदाजाला साजेसे नसले, तरी कठीण परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याचा मार्ग कसा काढावा याची त्याला माहिती आहे. धोनी सुरूवात संथ करून नंतर आपल्या खेळीचा वेग वाढवण्यामध्ये पटाईत आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीला सलामीवीर म्हणून संधी देण्यात काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?, असे ट्वीट पार्थिव पटेलने केले.

आयपीएलच्या इतिहासात एमएस धोनी मॅचमध्ये ओपनिंगला आला असे कधीच घडले नाही. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतही एमएस धोनी फार कमी वेळा सलामीला आला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीने दोन सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे, ज्यामध्ये त्याच्या नावावर 98 धावा आहेत. यामध्ये एमएस धोनीने एका डावात 96 धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात केवळ नाबाद 50 धावांची खेळी नोंदवली आहे. एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 50*, 16*, 23 आणि 3 धावा केल्या आहेत.