धोनीचा नवा इतिहास! IPL च्या 19 वर्षांत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट; सलग 5 व्या सामन्याला मुकला ‘कॅप्टन कूल’

WhatsApp Group

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कणा मानला जाणारा दिग्गज खेळाडू एमएस धोनी याच्या अनुपस्थितीमुळे चाहते चिंतेत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) महत्त्वाच्या सामन्यातही धोनी मैदानात न उतरल्याने एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, चेन्नई आणि कोलकाता समोरासमोर असूनही धोनी प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही.

KKR विरुद्ध ३२ सामन्यांनंतर पहिल्यांदाच गैरहजर

चेन्नई आणि कोलकाता या दोन संघांमध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये ३२ वेळा आमना-सामना झाला आहे. या सर्व ३२ सामन्यांमध्ये एमएस धोनी मैदानात हजर होता. मात्र, आजच्या २२ व्या सामन्यात धोनी खेळत नसल्याने हा अनोखा विक्रम संपुष्टात आला आहे. धोनी विना चेन्नईचा संघ पहिल्यांदाच केकेआरच्या आव्हानाला सामोरे जात आहे.

सलग ५ व्या सामन्याला मुकला; दुखापतीचे सावट कायम

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. धोनीने या मोसमातील सलग पाचवा सामना मिस केला असून तो अद्याप एकाही सामन्यात खेळू शकलेला नाही. धोनीच्या गुडघ्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते, ज्याचा मोठा फटका चेन्नईच्या कामगिरीवर बसताना दिसत आहे. धोनीच्या अनुभवाअभावी ऋतुराज गायकवाड़च्या नेतृत्वाखालील संघ फलंदाजी आणि रणनीतीमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.

अजिंक्य रहाणे विरुद्ध संजू सॅमसन; ‘तळाच्या’ संघांमध्ये लढत

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ गुणतालिकेत खालच्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत ४ पैकी ३ सामने गमावले आहेत. कोलकाताने आपल्या संघात वरुण चक्रवर्तीला स्थान दिले आहे, तर चेन्नईने जुन्याच संघावर विश्वास कायम ठेवला आहे. संजू सॅमसन सध्या चेन्नईच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.