
MS Dhoni Birthday : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 7 जुलैला त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी धोनी इंग्लंडमध्ये गेला आहे. उजव्या हाताचा फलंदाज महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली अनेक विक्रम केले आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे.
धोनीचा जन्म रांची, बिहार येथे झाला आणि तो हिंदू राजपूत कुटुंबातील आहे. धोनीच्या वडिलांचं नाव पान सिंग आणि आईचं नाव देवकी देवी असं आहे. त्याचे आई-वडील उत्तराखंडमधून रांची, झारखंड येथे रहायला गेले जिथे त्याचे वडील पान सिंग MECON मध्ये ज्युनिअर मॅनेजमेंटमधील पदावर कार्यरत होते. त्याला एक बहीण आणि मोठा भाऊ आहे. धोनीची मातृभाषा भोजपुरी आहे आणि तो तमिळ देखील बोलतो. धोनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी…
1) आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली तीनही प्रमुख आयसीसी स्पर्धा, टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. मैदानावरील त्याच्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला धोनी भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने कसोटीत 4,876 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 10,773 धावा केल्या. माहीच्या नावावर टी-20 मध्ये 1,617 धावा आहेत.
2) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 195 स्टंपिंग केले आहेत. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने 139 आणि श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक रोमेश कालुवितर्णाने 101 स्टंपिंग केले आहेत.
3) धोनीचा ट्रेड मार्क हेलिकॉप्टर शॉट आहे
धोनीचा ट्रेड मार्क हेलिकॉप्टर शॉट आहे. त्याने हा शॉट आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा खेळला असून चेंडू सीमापार पाठवला आहे. माही अजूनही आयपीएलमध्ये हा शॉट मारताना दिसतो. हा शॉट त्याने झारखंडचा माजी क्रिकेटपटू आणि मित्र संतोष लाल यांच्याकडून शिकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
4) ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोनदा जिंकणारा एकमेव खेळाडू
ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोनदा जिंकणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. MS धोनीच्या कारकिर्दीच्या ठळक वैशिष्ट्यांच्या यादीत हा एक महत्वाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोनदा जिंकणारा तो इतिहासातील एकमेव खेळाडू आहे . धोनीने 2008 आणि 2009 मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.
5) कर्नलचा मानद सन्मान मिळवणारा धोनी हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू
धोनीला लष्कराकडून लेफ्टनंट कर्नलचा मानद सन्मान देण्यात आला आहे. महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारा माही हा दुसरा क्रिकेटर आहे. इंडियन टेरिटोरियल आर्मीने 2011 मध्ये धोनीला लेफ्टनंट कर्नल ही पदवी देऊन सन्मानित केले होते.