
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लव्ह जिहादशी संबंधित एका प्रकरणात फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे राजापेठ पोलिस ठाण्यात त्या आक्रमक झाल्या आणि यावेळी त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका हिंदू मुलीला एका समाजाच्या मुलाने पोलीस ठाण्यात पळवून लावल्याच्या मुद्द्यावरून नवनीत राणा बुधवारी आक्रमक झाल्या. तरुणाने जबरदस्तीने हिंदू मुलीशी लग्न केल्याप्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच तरुणीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करा, अशी मागणी करीत नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच बाचाबाची झाली.
हिंदू तरुणीला डांबून ठेवण्यात आले असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो काहीही माहिती देण्यास तयार नाही. पोलीसही तत्परतेने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. आपण जेव्हा राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी आपले संभाषण रेकॉर्ड केले हा हक्क त्यांना कोणी दिला असा सवाल नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी चांगलीच बाचाबाची झाली. राजापेठ पोलीस ठाण्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.