अमरावती – शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्यादिवशी ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसेचं पठण करेन, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्यासोबत आहे.
याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे, असंही नवनीत राणा यांनी म्हणाल्या आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनी आपण मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणून, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर आज आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांना राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा, असं आव्हान दिलं होतं.
शिवसैनिकांच्या या आव्हानावर रवी राणा यांनीही अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मी आज हनुमानाची पूजा केली. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. उद्धव ठाकरे हे दिशाहीन झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्याला साडेसाती लागली आहे.
त्यामुळे शिवसैनिकांनी माझ्याविरोधात आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं. जेणेकरून राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होण्यास मदत होईल. माझ्यापाठी राम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास मला कुणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असं रवी राणा यांनी म्हटले.