खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहामधून सुटका

WhatsApp Group

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर, तुरुंगात गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने काल(बुधवार) जामीन मंजूर केला. त्यानंतर आज खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहामधून सुटका झाली आहे. त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेलं जाणार आहे.

राणा दाम्पत्य हे मागील बारा दिवसांपासून तुरुंगामध्ये होतं. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. त्यानंतर त्यांनी विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. अटकेपूर्वी राणा दाम्पत्याला नोटीस देणे गरजेचे होते. अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मुंबई पोलिसांना त्यांना अटक केली. त्यामुळे बचाव पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करत राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.