नवनीत राणांना कोसळलं रडू, रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

मुंबई – प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला.

आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेल्या आहेत. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे.

तळोजा तुरुंगामधून सुटका होताच रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत होते. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती.

नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्यामुळे त्या वारंवार रुग्णालयामध्ये जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. त्यानंतर काल भायखळा तुरुंग प्रशासनाने त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.

पण त्यानंतर रात्री त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात नेलं होतं. जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी तुरुंगातून सुटका होताच, नवनीत राणा लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना याठिकाणी दाखल करून घेण्यात आलं. नवनीत राणा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पती रवी राणा यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.