
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. मुलगा होशांग गोविल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, तबस्सुम यांनी 18 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. मात्र ही बातमी अंतिम संस्कारानंतरच लोकांना द्यावी, अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे शनिवारी ही माहिती देण्यात आली.
मुलगा होशांग गोविल म्हणाला- तबस्सुम यांचा काल रात्री 8.40 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या एकदम बऱ्या होत्या. दहा दिवसांपूर्वी आम्ही शूटिंगही केले होते. आम्ही पुढच्या आठवड्यात शूटिंगही करणार होतो. हे सर्व अचानक घडले. त्यांना गॅस्ट्रिकचा त्रास होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला, मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली. दोन मिनिटांत त्यांना दोन हृदयविकाराचे झटके आले.
तबस्सुम यांनी 1947 मध्ये बेबी तबस्सुम नावाने ‘नर्गिस’ या हिंदी चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. 70 च्या दशकात त्यांनी एक यशस्वी टेलिव्हिजन होस्ट म्हणून आपला ठसा उमटवला. दूरदर्शनवर 21 वर्षे चाललेल्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ या टॉक शोमध्ये त्यांनी अनेक बड्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. हा शो 1972 मध्ये सुरू झाला आणि 1993 पर्यंत चालला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आपल्या यूट्यूब चॅनलसाठी सतत व्हिडिओ बनवत होत्या. तबस्सुम यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी अयोध्येत झाला. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव आणि आई असगरी बेगम हे स्वातंत्र्यसैनिक होते.