Maharashtra Rain: अमरावतीमध्ये घर कोसळून आई, मुलीचा मृत्यू; कुटुंबातील इतर तीन जण जखमी

WhatsApp Group

अमरावती : अमरावती जिल्ह्यात मंगळवारी सकाळी घर कोसळून एक महिला आणि सात वर्षांची मुलगी ठार झाली आहे तर कुटुंबातील इतर तीन जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ही घटना नागपूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव गावात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

अमरावतीचे जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवाल यांनी  सांगितले की, घटनेच्या वेळी कुटुंबातील पाच सदस्य घरात होते आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांचे शेजारी आणि इतर काही जण जखमी कुटुंबातील तीन सदस्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 35 वर्षीय महिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीला ढिगाऱ्यातून लवकर बाहेर काढता आले नाही, त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. तीन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांनी गडचिरोलीतील पूरग्रस्त भागात मदतकार्य केले आणि लोकांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शनिवारी महाराष्ट्र राज्य आपत्ती परिस्थिती अहवाल निर्देशांकाच्या अहवालानुसार, 1 जूनपासून महाराष्ट्रात पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमध्ये एकूण 102 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसडीएमडीनुसार, आतापर्यंत प्राण्यांच्या मृत्यूची संख्या 189 होती. महाराष्ट्र एसडीएमडीच्या 16 जुलैच्या अहवालानुसार राज्यात सुमारे 11,836 लोकांना बाहेर काढण्यात आले आणि 73 मदत शिबिरे उभारण्यात आली.