जयपुर – जयपुर जिल्ह्यात आज एका मुलाने आईचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मात्र प्रयत्न करून देखील तरुण आपल्या आईला वाचवू शकला नाही. जयपूरमधील चाकसू भागामध्ये झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे आई आणि मुलगा दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी आई आणि मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबीयांकडे सोपवला आहे. एकुलत्या एका मुलाला गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व घटना जयपूरमधील चाकसू भागामध्ये घडली आहे. आज सकाळी साधारण 10 च्या दारमान गिर्राज (वय 25) आपली आई सोना देवी (वय 48)सोबत शेतात काम करीत होता. यादरम्यान सोना देवी पाणी आणण्यासाठी शेताजवळ असलेल्या विहिरीजवळ गेली. येथे पाणी भरताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली.
यादरम्यान शेतात काम करणाऱ्या गिर्राजचे आपल्या आईकडे लक्ष गेले. आईला विहिरीत पडताना पाहून गिर्राज थेट विहिरीच्या दिशेने धावला आणि त्याने लगेच विहिरीमध्ये उडी मारली. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. यानंतर गावकरी विहिरीजवळ पोहोचले आणि त्यांना विहिरीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले.
यादरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांना ही बातमी दिली. पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलावले. त्यांनी मिळून दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये हलवलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मुलाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आईसाठी वाचवण्यासाठी थेट विहिरीत उडी घेतली. मात्र यात दोघांचाही मृत्यू झाला.