
मुंबई – उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं कठीण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसातच आता ठाणेदेखील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून निसटताना दिसत आहे. महानगरपालिकेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यांनी याबाबत घोषणा केली.
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नवी मुंबईतील ३० नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय चौगुले यांच्यामाध्यमातून शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आला.
दरम्यान आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.