
यावर्षी मान्सून (Monsoon) लवकर दाखल होणार असल्यामुळे देशवासियांना चांगलाच आनंद झाला होता. पण मान्सून अरबी समुद्रातमध्ये(Arabian Sea) दाखल होऊन त्याने तिथेच विश्रांती घेतली त्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. अशामध्ये आता हवामान खात्याने दिलासादायक माहिती दिली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून 27 मे रोजी म्हणजे आज केरळमध्ये (Keral) दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल.
उष्णतेचा पारा वाढत चालला असून उकाड्यामुळे हैराण झालेले देशवासीय मान्सून कधी दाखल होणार याची वाट पाहत आहेत. पण अशामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचे मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.
दरम्यान, आज देखील हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भामध्ये मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.