
राज्यात या महिन्यात पावसाचं कमबॅक होणार. ऑगस्ट महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर सप्टेंबर महिना राज्यासाठी वरदान ठरू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. हवामान खात्याच्या या अंदाजानंतर शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे. सप्टेंबरच्या पंधरवड्यात दख्खनचे पठार आणि मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
IMD च्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस पडेल. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान दख्खन पठार आणि मध्य भारतात पावसाचे पुनरागमन होऊ शकते. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या किनारपट्टी भागात पाऊस पडेल.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भाग दुष्काळाच्या संकटात आहेत. ऑगस्ट महिन्यात राज्यात 59.42 टक्के कमी पाऊस झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. देशात 36 टक्के कमी पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 11 टक्के पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे.
केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक राज्ये दुष्काळाच्या संकटाला तोंड देत आहेत. 123 वर्षांनंतर ऑगस्ट हा सर्वात कोरडा महिना असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 1901 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस झाला होता. यंदाही तशी शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, मणिपूर, अरुणाचल, आसाम, लडाख, हिमाचलच्या अनेक भागात भीषण दुष्काळ पाहायला मिळत आहे.