मोहम्मद शमी बनला वनडेत सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

WhatsApp Group

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 150 बळी घेणारा भारतीय ठरला आहे. मोहम्मद शमीपूर्वी हा विक्रम भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नावावर होता. मोहम्मद शमी वनडेमध्ये 150 विकेट घेणारा जगातील तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. आगरकरने 97 एकदिवसीय डावात 150 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज होण्याचा मान पटकावला होता, परंतु शमीने अवघ्या 80 डावात हा विक्रम गाठला आणि आगरकरला मागे टाकले आहे.

सर्वात जलद 150 वनडे विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर आहे, ज्याने 77 डावात हा विक्रम केला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सकलेन मुश्ताक आहे ज्याने 78 डावात 150 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमीने 80 डावात 150 एकदिवसीय विकेट घेत अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानची बरोबरी केली आहे. या यादीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ब्रेट ली पाचव्या स्थानी आहे.

याशिवाय मोहम्मद शमी सर्वात कमी चेंडूत 150 वनडे विकेट्स घेत स्टार्क (3857 चेंडू) आणि श्रीलंकेचा अजंथा मेंडिस (4029), सकलेन मुश्ताक (4035), राशिद खान (4040) यांच्या मागे पाचव्या स्थानावर आहे. मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4071 चेंडू टाकून 150 बळी पूर्ण केले आहेत.

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वात जलद 150 विकेट्स

  • 80 सामने – मोहम्मद शमी
  • 97 सामने- अजित आगरकर

सर्वात कमी एकदिवसीय सामन्यात 150 विकेट

  • 77 सामने –  मिचेल स्टार्क
  • 78  सामने – सकलेन मुश्ताक
  • 80 सामने – राशिद खान / मोहम्मद शमी
  • 81 सामने- ट्रेंट बोल्ट
  • 82 सामने – ब्रेट ली

सर्वात कमी चेंडूत 150 एकदिवसीय विकेट

  • 3857 मिचेल स्टार्क
  • 4029 अंजता मेंडिस
  • 4035 सकलेन मुश्ताक
  • 4040 रशीद खान
  • 4071 मोहम्मद शमी