IND vs SA: जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश, BCCI ने केली मोठी घोषणा

WhatsApp Group

IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी कोण खेळणार याची घोषणा केली आहे. मोहम्मद सिराजला भारताच्या T20 संघात स्थान देण्यात आले आहे. बुमराह पहिल्या T20 मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर गेला होता आणि खुद्द बोर्डाने याची माहिती दिली होती. तो आता संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला असून आता त्याच्या जागी सिराजला एंट्री मिळाली आहे. यापूर्वी मोहम्मद शमीलाही संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले होते.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, बुमराहच्या जागी सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी संघात सामील करण्यात आले आहे. याशिवाय बुमराहच्या दुखापतीबाबत बोर्डाने सांगितले की, त्याच्या पाठीला दुखापत झाली असून तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

या मालिकेपूर्वीच दीपक हुडा आणि मोहम्मद शमी हे तिन्ही सामन्यांमधून बाहेर होते. यानंतर श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आणि शहबाज अहमदचा अतिरिक्त पर्याय म्हणून समावेश करण्यात आला. दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या जागी ऑस्ट्रेलिया मालिकेत संघात पुनरागमन केलेल्या उमेश यादवला या मालिकेतही कायम ठेवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर होता. अशा परिस्थितीत, एकामागून एक दुखापती आगामी T20 विश्वचषक 2022 च्या दृष्टीने भारतीय संघासाठी मोठा धोका बनू शकतात. उर्वरित दोन सामने 2 ऑक्टोबर (गुवाहाटी) आणि 4 ऑक्टोबर (इंदूर) रोजी होणार आहेत.

भारताचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.