ICC ODI Rankings: गोलंदाजांच्या क्रमवारीतही टीम इंडिया चमकली, ‘हा’ डॅशिंग खेळाडू बनला नंबर 1 गोलंदाज

WhatsApp Group

एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत करून भारतीय संघाने आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचवेळी बुधवारी जाहीर झालेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. बर्‍याच काळानंतर टीम इंडियाचा एक गोलंदाज पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी या खेळाडूने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या श्रीलंका मालिकेत 9 विकेट्स आणि त्यानंतर न्यूझीलंड मालिकेत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

आम्ही हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबद्दल बोलत आहोत, ज्याला टीम इंडियाचा मियाँ म्हटले जाते. कसोटीनंतर या स्टार वेगवान गोलंदाजाने आता वनडे संघातही आपले स्थान पक्के केले आहे. या खेळाडूने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा अशा प्रकारे फायदा घेतला की आज तो जगातील नंबर वन वनडे गोलंदाज बनला आहे. 2022 मध्ये त्याने 24 विकेट घेतल्या होत्या. आणि या वर्षी त्याने अवघ्या एका महिन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.

गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजनंतर हार्दिक पांड्याला सर्वात मोठा फायदा झाला आहे. हार्दिकने आता 87व्या स्थानावरून 80व्या स्थानावर 7 स्थानांची झेप घेतली आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध एकमेव तिसरा एकदिवसीय सामना खेळणारा आणि 2 बळी घेणारा युझवेंद्र चहल आता 42 व्या स्थानावरून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 3 बळी घेऊन सामनावीर ठरलेला शार्दुल ठाकूर आता 38व्या स्थानावरून 35व्या स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 22 व्या स्थानावरून 24 व्या स्थानावर घसरला आहे. त्याच वेळी, वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही 3 स्थानांचे नुकसान झाले आणि तो 32 व्या स्थानावर घसरला. या सगळ्यात टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तो 20 व्या स्थानावर कायम आहे. मोहम्मद सिराज आता 729रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. जॉश हेझलवूड (727) दुसऱ्या स्थानावर आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (708) तिसऱ्या स्थानावर आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा