मोदी सरकार दिल्लीच्या ऐतिहासिक ‘राजपथचे’ नाव बदलण्याच्या तयारीत

WhatsApp Group

केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ Kartavya Path करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, नवी दिल्ली नगर परिषदेने (NDMC) राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे ‘कर्तव्य पथ’ असे नामकरण करण्याबाबत 7 सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली असून हा प्रस्ताव परिषदेसमोर ठेवला जाईल. इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग आणि परिसर कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून लवकरच राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्याची अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन (रायसीना हिल) पर्यंतचा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी येथे भव्य परेड होते. राजपथ हा नवी दिल्ली नगर परिषद (NDMC) अंतर्गत उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. इंग्रजांच्या काळात राजपथला किंग्सवे म्हटले जायचे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात, 2016 मध्ये, दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रेसकोर्स रस्त्याचे लोककल्याण मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. त्याच, औरंगजेब रोडचे 28 ऑगस्ट 2015 रोजी मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्यात आले.
– समीर आमुणेकर