पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘मी १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांवरून पुन्हा एकदा आक्रमक इशारा दिला आहे.
‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असे नाही, याचा त्रास सर्वांनाच होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यासाठी देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावे. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढा नाहीतर आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांवरूनही राज ठाकरे यांनी आता इशारा दिला आहे. ‘तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातामध्ये द्यायला लावू नका. शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ,’ असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.