लालूंच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा, रस्त्यावर पेन विकणाऱ्या मुलीला घेऊन दिला ‘आयफोन’
पटना – लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. मात्र या वेळी तेज प्रताप यादव हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत.
तेज प्रताप यादव हे शनिवारी पटनाच्या बोरिंग रोडवर मिठाई खाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान त्यांची नजर तिथे एका पेन विकणाऱ्या लहान मुलीवर पडली. या लहान मुलिला पाहुन तेज प्रताप यादव तिथेच थांबले आणि त्या मुलीशी बोलू लागले.
या संभाषणात पुनाईचकच्या असेलेल्या त्या लहान मुलीने तेज प्रताप यादव यांना सांगितले की तीचे वडील हे ऑटो रिक्षा चालवतात. आणि ती आता शाळेतही जात नाही मात्र क्लासला जाते. याचदरम्यान तेज प्रताप यांनी त्या मुलीला गेम खेळण्यावरून काही प्रश्न विचारले. हे संभाषण चालू असताना भविष्यात मदत करण्यासाठी त्या मुलीला तेज प्रताप यांनी आपला नंबर देऊ केला. त्यावर ती मुलगी म्हणाली की आपल्याकडे मोबाईल नाहीये. हे ऐकून तेज प्रताप यादव त्या मुलीला एका मोबाईल स्टोअरवर घेऊन गेले आणि त्या मुलीला त्यांनी चक्क आयफोन घेऊन दिला.
तेज प्रताप यांनी त्या गरीब मुलीला दिलेल्या या आयफोनची किंमत ही जवळपास ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तेजने त्या मुलीला सांगितले की हा फोन घे आणि यावर तू आता अभ्यास कर. तसेच त्यांनी आपला फोन नंबरही तिला देत हा फोन कसा वापरायचा, चार्ज कसा करायाचा याबद्दलही पूर्ण माहितीही दिली.
तेज प्रताप यादव आणि मुलीसोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्या मुलीला हे माहितचं नव्हतं की ज्याने तिला एवढा महागडा फोन घेऊन दिला आहे ते नक्की कोण आहेत. नंतर त्या मुलीला आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की ते लालू प्रसाज यादव यांचे पुत्र तेज प्रताप आहेत. तेज यांत्या या प्रेमळ स्वभावाची चर्चा पूर्ण भारतभर होत असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.