रोहित पवार बनले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, किरण सामंत उपाध्यक्षपदी

WhatsApp Group

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल MCA च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. तसंच mca चे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन.

माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं. क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.”