
मुंबई – मुंबईतील अंधेरी पूर्व विधान सभा मतदार संघातील शिवसेनेते आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आमदार रमेश लटके हे त्यांच्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते तीथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.
आमदार लटके यांच्या निधनाची माहीती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवली आहे. लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही समोर आली आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिली आहे.