
Mithilesh Chaturvedi Passes Away: बॉलिवूडसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. ‘कोई मिल गया’, ‘गदर’, ‘बंटी और बबली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले मिथिलेश चतुर्वेदी यांनी 3 ऑगस्टच्या संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार मिथिलेश यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे.
मिथिलेश चतुर्वेदी यांच्या मृत्यूला त्यांच्या जावयाने दुजोरा दिला आहे. आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिथिलेश यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी लखनऊ येथे हलवण्यात आले, तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिथिलेश चतुर्वेदी अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी हृतिक रोशनचा चित्रपट ‘कोई मिल गया’, सनी देओलसोबत ‘गदर एक प्रेम कथा’अशा अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. पटियाला बेब्समध्ये ते दिसले होते. याशिवाय वेब शो स्कॅममध्ये ते राम जेठमलानीच्या भूमिकेत दिसले होते.