महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानामध्ये उतरताच भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने Mithali Raj ने नवा इतिहास घडवला आहे. मिताली राज ही आता 6 आयसीसी वन-डे वर्ल्ड कप खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.
याआधी पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदाद आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 6 वन-डे वर्ल्ड कप खेळले आहेत. मितालीने त्यांची बरोबरी केली असून हा रेकॉर्ड करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने 2000 साली न्यूझीलंडमध्ये पहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळली होती. त्यानंतर 2005, 2009, 2013 आणि 2017 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतमध्येही मिताली टीम इंडियाकडून खेळली आहे.
मितालीने वन-डेसह टी20 मध्येही टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. मात्र वन-डे क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी तिने टी-20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मितालीने आजवर 225 वन-डेमध्ये 51.85 च्या सरासरीने 7623 रन केले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे.
सहाव्या वर्ल्ड कपमध्ये मितालीने निराशा केली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये ती फक्त 9 रन काढून आऊट झाली. या 9 धावांसाठी तिने 36 बॉल घेतले. मिताली राजचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. आता यंदाच्या स्पर्धेत हे स्वप्न पूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न असेल.