मुंबई – ‘मिर्झापूर’ गाजलेल्या या वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्मा मिश्राचं दुःखद निधन झालं आहे. ‘मुन्ना भैय्या’ अर्थात दिव्येंदू शर्माने सोशल मीडियावर ब्रह्मा मिश्राचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. ललितच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणाऱ्या ब्रह्मा मिश्राचे इतक्या लहान वयात सोडून जाणे हे सर्वांसाठीच खूप दुःखदायक आहे. मिर्झापूरमध्ये गुड्डू पंडितची भूमिका करणारा अली फजलनेही पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
36 वर्षीय ब्रह्मा मिश्राचा मृतदेह त्यांच्या वर्सोवा येथील घरातील बाथरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित बाथरूममध्ये असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
अभिनेता ब्रह्मा मिश्रा गेल्या चार वर्षांपासून त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना वर्सोवा इनलाखास सोसायटीमधून विचित्र वास येत असल्याची तक्रार करणारा फोन आला होता. पोलीस ब्रह्माच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर तो फ्लॅट आतून बंद होता. यानंतर पोलिसांनी चावी बनवणाऱ्याला बोलावले आणि फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. फ्लॅटच्या आत गेल्यानंतर बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचे असल्याने पोलीस बाथरूममध्ये गेले असता त्यांना ब्रह्मा मिश्राचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
View this post on Instagram
कूपर रुग्णालयात ब्रह्माच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. ब्रह्मा मिश्राचा भाऊ संदीपच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी ब्रह्माच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 29 नोव्हेंबरला ब्रह्मा मिश्रा छातीत दुखत असल्याने डॉक्टरांकडेही गेला होता, त्यानंतर ब्रह्माला गॅसचे औषध देऊन घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला.
ब्रह्मा मिश्राने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते, परंतु त्यांला खरी ओळख मिळाली ती मिर्झापूर वेबसिरीजमध्ये साकारलेल्या ललित या भूमिकेमुळे. मिर्झापूरमध्ये त्याचे काम पाहिल्यानंतर क्वचितच असा कोणी असेल, ज्याने त्याच्या भूमिकेची दखल घेतली नसेल. ब्रह्म मिश्राच्या जाण्याने मिर्झापूरच्या स्टारकास्टवरही शोककळा पसरली आहे.