मुंबई : आदगाव समुद्रकिनारी पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण करण्याबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर नाममात्र दरात ग्रामपंचायतीने देखभाल दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
आदगाव बीच, श्रीवर्धन, सी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्प जामगाव, श्रीवर्धन परिसरातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील नगरविकास विभागातील प्रलंबित विषय, प्रादेशिक परिवहन क्षेत्र माणगाव येथे ब्रेक टेस्ट ट्रेक करणेसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी मंत्रालयात घेतला.
बैठकीत माजी आमदार अनिकेत तटकरे, रोहाचे मुख्य अधिकारी अजयकुमार एडके, श्रीवर्धनचे मुख्य अधिकारी विराज लबडे, मेरिटाईम बोर्डचे अभियंता श्री. देवरे, उपविभागीय अभियंता तुषार लुंगे, सहायक अभियंता सोनिया महंद, श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, आदगाव येथील अस्तित्वातील दगडी बंधाऱ्याच्या पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण करून त्यावर मत्स्यजेट्टीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेस गती द्यावी. श्रीवर्धन मधील नगरपरिषदमधील प्रलंबित कामांसाठी निधी वितरीत करण्याची प्रक्रिया राबवावी. घनकचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण व शहराची स्वच्छता राखण्यासाठी रोहा नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहा वन विभागातील मौजे जामगांव येथे विकसित करावयाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता, वन व वनस्पती उद्यान अंतर्गत कामांना गती देण्याच्या सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.