वानखेडेवर रंगणार ‘महायुद्ध’! मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी; कोणाची होणार सरशी?

WhatsApp Group

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Wankhede: आयपीएल २०२६ च्या रोमांचक टप्प्यावर आता दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पर्धेतील २० व्या सामन्यात पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रणसंग्राम रंगणार आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. मुंबईला दोन सामन्यांत पराभवाचा धक्का बसला असून केवळ एकाच विजयाची नोंद करता आली आहे. दुसरीकडे, आरसीबीने तीनपैकी दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी हा सामना दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा ठरणार आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये मुंबईचा वरचष्मा

आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर मुंबई इंडियन्सचे पारडे आरसीबीपेक्षा जड असल्याचे दिसून येते. आतापर्यंत या दोन बलाढ्य संघांमध्ये एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने २१ सामन्यांत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या वाट्याला केवळ १४ विजय आले आहेत. मात्र, गेल्या काही हंगामात आरसीबीने मुंबईला जोरदार टक्कर दिली आहे. मागील पाच लढतींचा विचार केला तर आरसीबीने ३-२ अशी निसटती आघाडी घेत मुंबईला पेचात पाडले आहे.

वानखेडेवर मुंबईचा ‘होम ग्राऊंड’ फायदा

मुंबईचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवरही आरसीबीसाठी विजय मिळवणे सोपे राहिलेले नाही. या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही संघ ११ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ७ सामन्यांत मुंबईने आपल्या प्रेक्षकांसमोर विजयाचा जल्लोष केला आहे, तर आरसीबीला केवळ ४ वेळाच या मैदानावर विजयाची चव चाखता आली आहे. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळपट्टीचा अंदाज मुंबईला या सामन्यातही फायदा मिळवून देऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

रोहित विरुद्ध विराट: वैयक्तिक कामगिरीवर सर्वांचे लक्ष

या महामुकाबल्यात केवळ दोन संघच नाही, तर जागतिक क्रिकेटमधील दोन मोठे स्तंभ म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या दोन्ही स्टार खेळाडूंची बॅट ज्या पद्धतीने तळपेल, त्यावरच या सामन्याचा निकाल अवलंबून असेल. एका बाजूला मुंबईची साखळी पुन्हा विणण्याचा रोहितचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे आरसीबीचे जेतेपद राखण्यासाठी विराट आपल्या खेळीने जोर लावताना दिसेल. त्यामुळे वानखेडेवर होणारा हा सामना केवळ गुणांसाठी नाही, तर अस्मितेसाठीही लढला जाईल.