MI vs GT: मुंबईचा नाद करायचा नाय… गुजरातचा 27 धावांनी केला पराभव

0
WhatsApp Group

IPL 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आज गुजरात संघाच्या पराभवानंतर प्लेऑफच्या तिकिटाची प्रतीक्षा वाढली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आपल्या 7व्या विजयासह प्लेऑफची लढत रंजक बनवली आहे. मागील सामन्यात गुजरातने मुंबईचा 55 धावांनी पराभव केला होता आणि आता या सामन्यात मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (29) आणि इशान किशन (31) यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली आणि 6.1 षटकात 61 धावा जोडल्या. यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर आला आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने नेहल वढेरा (15) आणि विष्णू विनोद (30) यांच्यासोबत उपयुक्त भागीदारी केली. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा करत आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. गोलंदाजीत आज मुंबईसाठी आकाश मधवाल चमकला आणि त्याने 31 धावांत तीन बळी घेत मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण पॉवरप्लेमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. आकाश मधवालने साहा आणि गिल या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर जेसन बेहरेनडॉर्फने कर्णधार हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. गुजरातचा निम्मा संघ 55 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. विजय शंकर (29) आणि डेव्हिड मिलर (41) यांनी थोडी झुंज दिली. राहुल तेवतियानेही 14 धावा केल्या मात्र तो मुंबईच्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटी रशीद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि शानदार खेळी करत गुजरातच्या चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने 32 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या आणि संघासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि 10 षटकार मारले. रशीदच्या या खेळीनंतर मुंबईने सामना जिंकला पण रशीदने मन जिंकले असे म्हणता येईल. त्याने 31 धावांत चार बळीही घेतले.

मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सला हरवून तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी गुजरात टायटन्सला 12व्या सामन्यात चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले पण तरीही ते अव्वल स्थानावर आहेत. सातव्या विजयानंतर मुंबईचे आता 14 गुण झाले आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह आहे. शनिवारी दुहेरी हेडरचे सामने होणार आहेत ज्यात लखनौ सुपर जायंट्सचा संघ देखील अॅक्शन करताना दिसणार आहे. म्हणजे उद्या गुणतालिकेत बरेच बदल होऊ शकतात.