MI vs DC: ‘दुनिया हिला देंगे हम…’ राजधानी दिल्लीला धूळ चारत मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री

WhatsApp Group

MI vs DC IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं ५ विकेटच्या मोबदल्यात १८० धावा केल्या. मुंबईनं दिलेलं १८१ धावांचं आव्हान दिल्लीला पार करता आलं नाही. मुंबईनं हा सामना ५९ धावांनी आपल्या नावावर करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर नमन धीरनं २४ धावांची तुफानी खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारनं २ विकेट घेतल्या. कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि दुष्मंथा चामीरा यांना प्रत्येकी १ यश मिळालं.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबईने २३ धावांवर रोहित शर्माच्या रूपात पहिली विकेट गमावली. मुस्तफिजूर रहमानने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. रोहित ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. यानंतर, विल जॅक्स १३ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याला मुकेश कुमारने पाठवले.

मुंबई इंडियन्सला रायन रिकोल्टनच्या रूपानं तिसरा धक्का बसला. त्याला कुलदीप यादवनं बळी बनवलं. रायन रिकेल्टन १८ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाची जबाबदारी घेतली, पण त्यानंतर तिलक वर्मा २७ चेंडूत २७ धावा काढून बाद झाला. त्याला मुकेश कुमारने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, कर्णधार हार्दिक पांड्या ३ धावा काढून दुष्मंथ चामीराचा बळी ठरला.

सूर्यकुमार यादव आणि नमन धीरची झंझावाती खेळी

यानंतर, वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या २ षटकांत सूर्या आणि नमन धीर यांचे वादळ दिसून आलं. दोघांनीही स्फोटक फलंदाजी करत मुंबई इंडियन्सचा धावसंख्या १८० धावांपर्यंत पोहोचवली. सूर्यानं ४३ चेंडूत ७३ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर नमन धीरनं ८ चेंडूत २४ धावांची नाबाद खेळी केली.

मुंबईचे गोलंदाज चमकले

१८१ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमकता राखत दिल्लीच्या खेळपट्टीवर दबाव टाकला. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि मिचेल सँटनर यांच्या माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी हार पत्करली.

दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार.

मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.